“महाराष्ट्र मातीच्या कनाकनात आणि माणसांच्या मन-मस्तीष्काच्या रोमारोमात जाज्वल्य असा इतिहास लपलेला आहे.” भूतकाळातील घटनांच्या छायेत अनूभवात्मक विचाराच्या पायरीने माणसाला वर्तमान सह भविष्याची शिडी पादाक्रांत करावयाची असते.म्हणूनच म्हणतात इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरत नाहीत..! आपल्याला तर ब्रम्हांड-पातळी शोधूनही सापडणार नाही अशा विचारांनवर आधारीत कृतियुक्त इतिहास आपल्या भूतकाळात घडून गेला आहे. तो काळ म्हणजे सोळावे शतक आपल्या “शिवरायांचा काळ” होय. हा काळ माणसाला कोणत्याही काळ-वेळ-परिस्थितीला प्रेरणा देऊन मार्गदर्शन करणारा आहे. म्हणून त्यांच्या जीवनाचरित्राचा सद्यपरिस्थितीला धरून घेतलेला हा मागोवा..!
“धन्य ते शहाजी-जिजाऊ त्यांनी सुसंस्कारीत केलेल्या शिवबाची आजच्या काळाला गरज आहे.” पण असा शिवबा घडण्यासाठी परिस्थितीला उघड्या डोळ्याने बघुन, तिचे वस्तुनिष्ठ मानवतावादी मूल्यमापन करणाऱ्या व त्यासाठी समर्पणात्मक त्यागाची भावना ठेवणार्या विचारी शहाजी-जिजाऊची निर्मीती होणे गरजेचे आहे.!” सध्या एक केल तरी चालेल प्रत्येक आई-वडिलांनी जिजाऊ-शहाजी राजेंसारखे मार्गदर्शन करत “आपल्या नजरेखाली” मुलांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्याला त्याचे “स्वराज्य” घडवू द्यावे. असे केल्याने तुमचा मुलगाच काय पण सारे जग तुमचा सन्मान करेल, पण जर मुलांना किरकिर करत असाल तर जग काय तुमचा मुलगा ही तुमचा सन्मान करणार नाही. आजच्या व्यवहारी जमान्यात मानवतावादी द्रुष्टीकोनाचा खूप मोठा “दुष्काळ” पडला आहे. तेंव्हा आजच्या जिजाऊ-शहाजीनी “संपती” कमवण्यात धन्यता मानण्यापेक्षा "सुसंस्कारीत संतती" कमवण्याकडे जास्तीचे लक्ष दिले तर कमावलेली सं
![]() |
पती डोळ्यादेखत गमावलेली पाहण्याची वेळ येणार नाही.!" आपल्या बाळकडूने आपल्या रत्नाला,आपले जन-जन्मदायीमुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाणिवपूर्वक घडवणार्या "जिजाऊ-शहाजी"ला यासाठी मानाचा मुजरा करणे उचित ठरते. चला ही त्यांची क्रुती आजच्या काळात आपणही “जपुया-पुजुया-वंदुया.!”
“कर्तव्य कठोर शिवबाने खेळण्याच्या वयात भोळ्या "शिव" प्रतिज्ञेवर स्वराज्य निर्माण केले.!” माणसाने कोणत्या मातीत,जातीत व धर्मात जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसते पण माणुस म्हणुन जगत असताना दुसऱ्याच्या "स्वातंत्र्य व स्वाभिमाना"ला ठेच न पोहचवता आपले "स्वराज्य" उभे करणे हे त्याचे जीवित कर्तव्य आहे. राजांचे शिवबा ते शिवराय हा जीवित प्रवास पाहिला तर त्यांनी कोठेही खास जात-धर्माचा प्रसार व प्रचारासाठी योजना आखून कार्यक्रम राबविला असे दिसत नाही. असे असते तर त्यांच्या "रयत" या संकल्पनेत व स्वराज्य निर्मीतीकार्यातील सैन्यात ऐका जातीचे/धर्माचे "गोतावळ" दिसायला पाहिजे होते पण तसे दिसून येत नाही. राजावरील संस्कारच मानवतावादी होते. शिवबा धार्मिक व्रुतीचे होते पण धर्मवेडे नव्हते.! तसे असल्याचे मला तरी उघड्या डोळ्याने दिसत नाही. त्यांनी दैववादाऐवजी आपल्या कार्यातून "कर्मवाद" बिम्बवला आहे. त्यांनी कोणत्या जातीला धरून काम केले नाही. उलट त्यांच्या कार्य-विचारावरुन असे दिसून येते की जो जात पाळत नाही तो खरा "जातवान". आठवा रांझे गावचा पाटिल....त्याही काळी मरहटा/मराठा हा शब्द स्थळ व स्थिती दर्शकच होता. जे लोक सह्याद्रीच्या कुशीत व शेजारील पठारावर वसलेले होते त्याना मरहट व नंतर मराठा समजले जायचे असा माझा समज आहे. परंतु आम्हा भारतीयांनच्या आवडीच खूप न्यार्या व तर्हेवाईक आहेत. आम्हाला घरातल्या स्वादिष्ट जेवणाऐवजी रस्त्यावरील चटपटीत चायनीज जसे जास्त आवडते तसेच इतिहास बाबतीत झाले आहे. ज्या इतिहासातील कर्तुत्वाचा पच्छिमी राष्ट्र आपल्या अभ्यासक्रमात समावेश करून "निती"वर संशोधन करतात, तो तेजस्वी इतिहास आम्ही जात-धर्म व स्वार्थासाठी बदल करून वापरतोत. ज्याचा जगात आदर्श म्हणुन डंका आहे तो आम्हाला खोटा व चुकीचा वाटतो. आम्हाला डसतो. आम्ही वाटून घेण्यात निसर्गाने निर्माण केलेले "रंग" आमच्या स्वार्थी "हेतूंसाठी बेरंग" केले तर जीवीत राष्ट्रपुरुषाची काय किम्मत.! बघा किती आहे आमच्यात हिम्मत ? शेवटी याबाबतीत एवढेच म्हणावे वाटते देश इसतरह भी बदलने लगा है की हमे गाय चराने मे शर्म और कुत्ता घुमाने मे गर्व महसूस होणे लगा है.!”
“अमानुष काळ युगामध्ये शिवबाने केवळ प्रेमाची हाक व सत्याच्या प्रामाणिक मार्गावर चलण्याचा विश्वास देऊन स्वतःसाठी जीव देणारी माणसे गोळा केली.!” १७ व्या शतकात सर्व बाबतीत मागास असलेल्या, वर्ण व्यवस्थेचा जबदस्त पगडा असणाऱ्या आणि मागील ५ ते ६ शतके गुलामगिरीची सवय लागलेल्या सामाजिक परिस्थितीत शिवबाने आपल्या मनातील "स्वराज्याचे राजकारण" साधने व सांधन्यासाठी सर्व जाती-धर्माची माणसे सवंगडी म्हणुन निवडून त्यांचे हात स्वराज्य बांधणीसाठी वापरले. तर आज सर्व बाबतीत "प्रगत" असणाऱ्या २०व्या व २१व्या शतकात स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी तथाकथित मंडळींनी एकसंघ होऊ पहात असलेल्या समाज्याला जाती-धर्मात विभागून त्यांच्यातील द्वेषाच्या व फुटीरतेच्या तव्यावर आपल्या राजकारणातील मनसुब्यांच्या पोळ्या भाजून घेतल्या व आजुनही घेत आहेत. आम्ही मात्र इतिहासाकडून खूप शिकून प्रगत झालोत याची शेखी मिरवत आणि भावनिकतेच्या पुरात वहात जात आहोत..!!" यासाठी आज भावनिक ऐकता व एकात्मता वाढवणे खूप आवश्यक वाटते.
“शिवबाने सामान्य माणसात विचारांच्या शब्दप्रेमाने आणि उच्चारानुसार आचरणाने स्वाभीमानाची-स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करून एक आदर्शवत जीवनप्रणाली तयार केली आहे जी काळ व युगबदलांनंतरही मराठी माणसांच्या नसानसात आजपावोत तेवत-धुमसत होती-आहे-राहणार.!” माणसांबाबतीत कोणत्याही काळ-युगामध्ये लागू पडणारी खुपच वास्तव रचना- "पद-पैसा-प्रतिष्ठाशी जोडलेली माणसे नेहमी आपल्या "पुढ्यात" उभी राहतात पण, जी माणसे आपले विचार-उच्चार-आचारणाशी जोडलेली असतात ती सदैव्य आपल्या "पाठीशी" उभी असतात..!!"
“सर्वसाधारण व मागास लोकांमधुनच शिवबाने कार्यक्षम माणसे निर्माण केली..!” यशाजी कंक,सूर्याजी काकडे,इब्राहिम खान,बाजी पासलकर,काझी हैदर,बाजीप्रभु देशपांडे,दौलत खान,नेताजी पालकर,मदारी मेहतर,तानाजी मालुसरे,रुस्तुमे जहाल,जीवा महाला आदि..नावे सांगता येतील. या सर्वांना शिवरायांनी त्यांच्यावर पिढ्यान् पिढ्या होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली व आपण मनात ठरवले व संघटीतपणे सत्याच्या मार्गाने स्वराज्याच्या गडावर मार्गस्थ झालोत तर गुलामी कायमची कडेलोट करून "आपला स्वाभिमान" जीवनशिखरावर फडकावत सुखाने जीवन जगू शकतोत हे स्वप्न दाखवले व त्या काटेरी मार्गाचा वाटसरू स्वतः होऊन काटेरी मुलुखाचे नेत्रुत्व शिवरायांनी स्वीकारले. या प्रेमळ शब्दांवर सामान्य जणांनी विश्वास ठेऊन आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या व सामान्य जनांसाठी काही शतकानंतर स्वराज्य निर्माण करू पाहणाऱ्या शिवबांचे "ढाल" हे लोक झाले. एवढेच नव्हे तर "प्रेम देऊन जीव लावणाऱ्या शिवस्वराज्यासाठी शिवप्रेमीनी आपला जीव अर्पिला..!" शिवकाळात याचे अनेक उदाहरणे आहेत पण प्रातिनिधीकस्वरूपात वाचा.. -शिवा काशीद...सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद तयार होत होते, तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात पाणी आल, तेव्हा शिवा काशीद यांनी विचारल, "राजे तुमच्या डोळ्यात आसु?!" तेव्हा राजे म्हणाले "शिवा तू हा पोशाख परीधान केला आहेस, याच बक्षिस काय मिळणार माहीत आहे तुला?.” शिवा काशिद म्हटले " होय, राजे मला माहीत आहे, शत्रुच्या वेढ्यात गेल्यावर शत्रु मला खतम करणार आहे, पण शत्रु मला मारताना शिवा काशिद म्हणुन मारणार नाही, तर "शिवाजी राजा" म्हणुन मारणार..! मला "राजे" म्हणुन मरायची संधी मिळतीये...माझ्या जीवनाचे यापेक्षा मोठे सार्थक ते काय होणार.. ही संधी दौडीन मी?” किती प्रेम-सामर्थ्य-निष्ठा आणि त्याग होता शिवा काशिदांच्या बोलण्यात..! हे लिहिताना हि डोळ्यात पाणी आले. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या न्यायाने कित्येक मावळ्यांनी आपल्या जीवाच्या आहुत्या आपल्या हातांनी दिल्या. आपल्या चिता आपल्या हातांनी रचल्या.आपल्या मुलाबाळांच्या डोक्यावरील छत्र स्वतःहून नष्ट करणाऱ्या व पत्नीच्या कपाळावरील कुंकू हाताने पूसणाऱ्या तमाम शिवमावळ्यांना एक शिवभक्त या नात्याने यानिमित्ताने मानाचा मुजरा.
"शिवबाने स्पृश्य-अस्पृश्यता नष्ट करून क्षत्रीय-ब्राम्हणांबरोबरच स्वराष्ट्र उभारणीसाठी बहुजनांच्या हाती तलवार दिली.!” शिवकाळाच्या आधी समाजव्यवस्था अभ्यासली तर लक्षात येते ते सामान्य जणांची स्थिति अस्थिर, भयग्रस्त, वर्गवारीवर आधारीत आणि शासकीय मानसिकता करंटी होती. ५ ते ६ शतके गुलामीची सवय लागल्याने सर्वसामान्य बहुजन समाज स्वाभिमानशून्य बनला होता नव्हे परिस्थितीने बनवला गेला होता. वर्गवारीनुसार समाजाची उतरंड आपले काम करतच होती. पण याच काळात जन्मलेल्या "शिवबा" हे खरे क्रांतीकारक योध्दे होते. मराठ्यांच्या इतिहासातील आद्य म्हटले तरी वावगे होणार नाही. त्यांनी या काळात सामान्य जणांमध्ये स्वाभीमानाचे स्फुलिंग पेटवून त्यांच्या हाती स्वराज्याची दुधारी तलवार दिली व समतेवर आधारित पहिले साम्राज्य उभे केले. पण दुर्दैवाने म्हणावे वाटते की, शिवस्वराज्यात शिवरायांनंतर पुढील शतकात पुन्हा वर्गवारी समाज व्यवस्था करंटया शासकांमुळे पुन्हा उदयास आली. एकूणच शिवकाळ पाहिला तर शक्ती-भक्ति-युक्ती-निती-प्रीति-श्रध्दा-उपासना या बाबतीत शिवरायांनी क्रांतीच घडवली आहे व ही क्रांती कोणत्याही काळात मार्गदर्शन करत होती-आहे-राहणार. याचमुळे स्वातंत्र्य चळवळीतील समाजसुधारक व नेते आपण आभ्यासले तर त्यांनी देखील शिवनिती-तत्वावर निष्ठा ठेऊन आपले समाजउध्दाराचे-सुधारणेचे-स्वातंत्र्य चळवळीचे कार्य पुढे नेल्याचे दिसून येते. शिवकाळाच्या मार्गदर्शनपर प्रेरणेनेच स्वातंत्र्यकाळ घडत व घडवत होता.महात्मा फुलें पासुन ते पंडित नेहरुंपर्यंत सर्वांनी त्यांना प्रेरणास्त्रोत मानले आहे. महामानवानी ही राजांचा आदर्श समोर ठेऊन कायम आदर्शवत असणाऱ्या राजघटना समतेवर आधारीत बनवली आहे. स्वातंत्र्यानंतर ही त्यांच्याच विचारांच्या छत्राखाली शासके उभी रहिली आहेत. कुतूहलाने व तेव्हड्याच अभिमानाने सांगावे वाटते मराठी मुलुखात शाषक होण्यासाठी शिवरायांचेच नाव घ्यावे लागते पण दुर्दैव हे की त्यांच्या विचार-निती-तत्वांचा म्हणावा तेवढा वारसा जपण्यात आम्ही कुठे तरी कमी पडतो आहोत असे वाटते?!"
“शिवस्वराज्यात सर्व स्रीया-प्रार्थनास्थळे हे संवेदनशील घटक सुरक्षित होते.!” जिथं परस्रीचा आदर केला जात नाही, तिथ "रामायण-महाभारत" घडत, तर जिथं परस्रिला माता-भगिनींचा दर्जा दिला जातो, तिथं "शिव-स्वराज्य" उभ राहत..!" असे अभिमानाने म्हणावं वाटत ते काय उगीच नाही. आजपर्यंत शिवरायांच्या इतिहासात झाली इतकी घुसळण व कलवाकालव कोणत्याही व्यक्ती वा कालखंडाच्या इतिहासात झाली नाही हा एक इतिहासच म्हणावा लागेल. हे करण्याचे कारण म्हणजे ज्या षंडाना स्वतःचा इतिहास घडवता येत नाही परंतु आपले राजकारण साधावयाचे आहे अश्यांसारख्याचे दुकान केवळ "शिवाजी" या तीन अक्षरांवर मागील साडेतीन शतके चालू आहे. तरीही कोणीही शिवरायांनी आपल्या हयातीत आपल्या स्वराज्यात ईतर धर्मांच्या प्रार्थनास्थळाना वा धर्मग्रंथाना आपल्या धर्माच्या विरोधी वागविल्याची नोंद चुकूनही सापडत नाही. उलटपक्षी जेथे होता होईल तेथे मानासह मदतच केल्याच्या नोंदी मात्र स्पष्ट अधोरेखित केलेल्या आहेत मग ती अफजल खानाची कबर बांधणी असो वा राज्यारोहणवेळी रायगडावर जगदीश्र्वराच्या मंदिराबरोबरच राजवाड्याच्या समोर मज्जीद उभी केल्याची असो. शिवरायांनी आपल्या राज्यातील व शत्रु राज्यातीलही स्रीयांना कायम माता-भगिनींचा दर्जा दिल्याच्या अनेक नोंदी इतिहासाने करून ठेवल्या आहेत. ज्या काळाच्या आधी व आत पर/शत्रुच्या स्रीला लुटणे यात मर्दानगी समजली जायची त्या काळात जन्मलेल्या असामान्य संस्कारक्षम शिवरायांनी कोणत्याही पर/शत्रु स्रीला एक शक्ती म्हणुन वंदिले पाहिजे ही मर्दानगीची शिकवण घालून दिल्याचे अनेक धडे शिवइतिहासात आपल्याला सापडतील. यामुळे लढाईवेळी व हराकिरीच्या प्रसंगातही शिवरायांपासुन व शिवसैन्यापासुन शत्रूला आपल्या घरातील स्रीयां बाबतीत कसलीच काळजी वाटत नसल्याचे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. शाहिस्तेखानला रोज "डायरी" लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान बुर्जी"असे आहे. त्यामध्ये "शिवरायांनी" केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद केलेला आहे आणि याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे. तो असं लिहितो.. “शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,भाईजान!” त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत म्हणाला,"शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच,पण जरी त्यांनी पळवली असेल तरी "बेफिक्र" राहा. कारण, तो "शिवाजी राजा" पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे! कोण आणि किती विश्वास, दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर..!! अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती, नंतर ती सापडली". यातून आजही तात्पर्य एवढचं घेता येईल कि, "आज या सबंध भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे".
"गनिमी कावा" ही शिवरायांनी मराठ्यांना दिलेली खुप महत्वाची देणगी आहे..!! “..शत्रूला दणका द्या पण तो देन्यापुर्वी शत्रूला कळू नये दिल्यानंतर आपण सापडू नये...!” शिवबाला लहानपणा पासुनच दूरदृष्टीने विचार करण्याची सवय होती. शिवरायांनकडे चारही शाह्याच्या तुलनेत सैन्य खुपच तोकडे होते. शेजारील चार ही शाह्या सर्वच बाबतीतील साम्राज्याने मातलेल्या होत्या. या सर्वांचा सामना करून आपला निभाव लागण्यासाठी शिवबांनी अतिशय लहानपणा पासुनच बलाढ्य शक्ती विरोधी एक युक्ती शोधून काढली व पूर्ण ह्यातभर स्वराज्य उभारण्याकामी तिचा उपयोग झाला ती म्हणजे "गनिमी कावा". संख्येने मर्यादित सैन्य सुध्दा लाखाला भारी पडत ते केवळ आणि केवळ या गनिमी काव्याच्या तंत्र-मंत्रामुळेच..! हा कावा यशस्वी झाला तो केवळ मावळ्यांतील जन्मजात काही गुणांनमुळे. शिवबांची कोणतीही चढ़ाई ही नियोजन बद्ध असायची. शांततेच्या काळात खुप मोठी तयारी दूरदृष्टीने ते करून ठेवत. ते नेहमी वास्तव परिस्थिती स्विकारत असत व त्यानुसार आपली वाटचाल ठरवत असत. “शिवइतिहास हा एक रचनात्मक जीवनसरणीतून घडलेली कृती आहे.!!” हवेची,जागेची व माणसांची पारख शिवरायांना हेवा वाटावा अशीच होती. आपल्या या नाविन्य पूर्ण योजनांच्या नियोजनबद्ध आमलबजावनीनेच शिवबा चारही दिशा विरोधी असतानाही आपल्या स्वराज्याचा अभेद्य पर्वत उभारू शकले. धन्य धन्य तो शिवब, आपल्या युक्तीला व बुध्दीला याबाबतीत मानाचा मुजरा.
"शिवबांनी आपल्या स्वराज्यात वतनदारी पध्दत बंद करून "वेतनदारी" सुरू केली व राज्यांचे पूर्वांपार चालत आलेली सत्तेच केंद्रीकरन ही पध्दत बदलून प्रत्येक विभागाचे "स्वतंत्र खाते" ही पध्दत सुरू केली..!" शिवस्वराज्याच्या आधी कोणत्याही शाहीत किंवा साम्राज्यात वतनदारी आणि प्रशासनात सत्तेचे एक हाती केंद्रीकरन या पध्दती रूढ व पूर्वांपारत चालत आलेल्या होत्या. वतनदारी मुळे ग्रामीण रयतेची दुप्पट पिळवणुक होऊन त्यांचे हाल होयचे. तसेच वतनदारांकडून सामन्यांची सर्वच प्रकारे लूट व्हायची व सामन्यांचे प्रश्न राजापर्यंत पोहचतच नसत. सत्तेचे एक हाती केंद्रीकरणामुळे नवीन उपक्रम नियोजन व राबवणुक होण्यास अडचणी निर्माण झाल्या व कान भरवणार्यांचे गोतावळे जमा झाले. या सर्वांमुळे भलेभले साम्राज्य लयाला गेली. तर एक शाही चे दोन तर दोनाच्या चार शाह्या तयार झाल्या. याची पारख दूरदृष्टी असणाऱ्या शिवबांनी लहान पणीच केली होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या स्वराज्यात वेतनदारी व स्वतंत्र खाते या पध्दती सुरू केल्या होत्या. याच 300 वर्षापूर्वीच्या सर्वसमावेशक पध्दती आम्ही स्वातंत्र्यानंतर प्रगत काळात शासन व प्रशासन बाबतीत स्वीकारल्या आहेत व आजतोपागत चालू आहे. कदाचीत अशामुळेच आपली लोकशाही एकसंघ आहे. मुजरा राजा तुझ्या दूरदृष्टीला..!!
"शिवरायांनी आपल्या स्वराज्य उभारणीच्या ध्येयाचे योग्य "मार्गस्थान" व त्याचे महत्व खुप लहानपणी म्हणजे वयाच्या १५-१६व्या वर्षी ओळखले होते ते म्हणजे "डोंगरी किल्ले"..!" होय चारही बाजूंनी असणाऱ्या साम्राज्यशाही शाह्याना व त्यांच्या सर्वच बाबतीत बलाढ्य व ताकतवान असणाऱ्या शक्तीना मात द्यायची असेल तर आपल्याला शक्ती पेक्षा युक्ती वापरावी लागेल हे शिवबांनी खुप लहानपणीच जाणले होते. आपल्या शत्रुच्या राजकीय व युध्दनितीच्या विचारउंचीला मागमौसही लागुन न देता लहान शिवबाने उंचावरील जागा ताब्यात घेऊन तेथे आपले स्वकल्पनात्मक ठाणे तयार करण्यास सुरुवात केली होती. त्याचे एकमेव कारण म्हणजे आपली सैन्यसामुग्री ही कमी असणार,कमी संख्येने सुध्दा उंचावरून शत्रुशी पध्दतशिर लढता येणार व शेजारील परीघीय भागावर उंचावरल्याचेच नियंत्रण राहणार हे शिवबांनी ताडले होते. म्हणुन त्यांनी आपल्या 30 वर्षाच्या समशेरीवरील जिवनात किल्ले बांधणीला व त्यांच्या संवर्धनाला विशेष महत्व दिल्याचे दिसून येते. 300किमी लांबीची चीनची भिंत बांधायला दिड्से वर्ष लागले व शिवरायांनी आपल्या 30वर्षात सर्व युध्दआघाड्या स्वतः सम्भाळून 300 किल्ले बांधले, त्यांची लांबी मोजली तर ती जवळजवळ 4000किमी भरते तरी आम्ही गर्वाने चीनच्या भिंतीला जगातील एक "आश्चर्य" मानतो याचेच मला आश्चर्य वाटते.! अतिशय प्रतिकूल,अस्थिर आणि अल्प कालावधीत मुरुमदेवाच्या डोंगरापासून सुरू झालेले हे काम अखंड 30 वर्ष चालू राहून 300बांधवांना(गडकिल्ले) सोबत जोडुन रायरी या ठिकाणापर्यंत चालू होते. वर्षानो वर्ष आत राहून बाहेरील शत्रुशी लढता येईल अशी जडण-घडण शिवरायांनी या गडकिल्ल्यांची केल्याचे दिसून येते. त्यांची एकूणच रचना पाहिली तर कोणतीही प्रगत साधनसुविधा नसताना व पारंपारिक तंत्र-हत्यारांच्या सहाय्याने बनवलेला वास्तूशास्त्राचा आजच्या तंत्र-हत्याराने प्रगत काळाला मार्गदर्शक अशी वास्तू रचना शिवरायांनी एकाचढ एक केल्याचे दिसून येते. साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेले गड्कोट आजही आहे तसेच अभेद्य असल्याचे दिसतात. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे या गडकोटांची व त्यासोबत मानवी भावनांची अभेद्य बांधणी होय..!! हे डोंगरी किल्ले म्हणजे केवळ भिंती समूह नसून स्वराज्याची खरी भिस्त होते. हे गडकिल्लेच आम्हाला आज स्वाभीमानाच्या जाज्वल्य इतिहासाच्या आठवणींची साक्ष देतात व आमच्या धमन्यानतीला रक्ताला अन्यायाविरोधी उसळी मारण्याची प्रेरणा देतात. पण आम्ही या गडरत्नांचे जतन,संवर्धन व पुनरभारणीत कमी पडत आहोत. शिवबांनी 300गडकिल्ले बांधले पण ऐकलाही स्वतःचे वा स्वः पूर्वजांचे नाव दिले नाही. त्यांनी ठरवले असते तर मागील 300पिढ्यांच्या नावांचा कुळोउध्दार त्याना या गडकोटाना नावे देऊन करता आला असता. पण शिवबा या भाबड्या विचारात रमणारे नव्हते. राजगड, विशाळगड, प्रचंडगड, प्रतापगड, सिंहगड, विजयदुर्ग ई.नावे शिवबांच्या “विशाल अंतःकरणाची साक्ष” देऊन जातात, तसेच आम्ही प्रगत काळात देखील "नावात" अडकून पडलो आहोत व आमच्या संकुचित मानसिकतेची नाव पैलतीरी घेऊन जाण्यास नक्कीच वाटसरूंची भूमिका निभावुन जातात. कोणत्याही आय.आय.टी.किंवा एम.आय.टी. मध्ये न शिकलेल्या शिवबातील या अनुभवात्मक वास्तूअभियंत्याला याबबातीत मानाचा मुजरा..!!
"आप्तस्वकीयांच्या साथीअभावी शिवबा दिल्ली ऐवजी रायगडी छ्त्रपती झाले..!" होय,हे विधान खेदजन्य,मान गमावून माना खाली घालावयास लावणारे आहे परंतु आमच्या प्रशिध्द "खेकडा" चालीस व संकुचित मानसिकतेला शिवकाळात व सध्या ही समर्पक दाखला देणारे आहे. शिवकाळात जिकडे शिवबांसाठीच जगायचं आणि स्वराज्यासाठीच मरायचं अशी भुमिका ठेऊन जगत असलेले असंख्य शिवभक्त मावळे झिजत होते तिथेच केवळ स्वार्थी मानसिकता व संकोचित खेकडा मनोवृत्तीच्या द्रुष्टीकोनातून जीवन जगत असणारे आणि शिवबांच्या स्वराज्य उभारणीच्या विचार-क्रुतीला विरोध करणारे खंडोजी-बाजी घोरपडे, बजाजी नाईक निंबाळकर, संभाजी मोहिते, चंद्रराव मोरे, क्रुष्णाजी भास्कर कुलकर्णी आदि लोक हे कोणी लांबचे व परके नव्हते तर स्वराज्य मुलुखातील आप्तस्वकीय होते. यांच्या "हलक्या कानानीं व मोठ्या तोंडानी" होणाऱ्या उपद्व्यापामुळे बिघडणारी परिस्थिती पूर्ववत करण्यात आणि यांचा बिमोड करण्यास शिवबांना बराचसा कालावधी घालवावा लागला. यांच्या कूटकारस्थानाना आलेला ऊत यामुळे शिवबांच्या अनेक बाबी यशस्वी होऊ शकल्या नाही किंवा त्या शिद्धिस नेण्यास जास्त कालावधी खर्ची घालावा लागला. या सर्वांनी स्वराज्याच्या कामी वाहून घेतले असते तर स्वराज्याचा राज्याभिषेक निच्छितच "रायगडा ऐवजी दिल्ली" येथे ही होऊ शकला असता असे म्हणावे वाटते. हे न घडण्याबाबतीत शिवरायांना अल्पआयुष्य भेटले हे सुध्दा आपले दुर्भाग्य म्हणावे लागेल. शिवबांना आणखी काही वर्ष आयुष्य मिळाले असते तर आपल्या नजरे समोर व हाताखाली घडलेल्या नव्हे घडवलेल्या आपल्या प्रतिभासम्पन्न व कर्तबगार शंभूच्या साथीने हे सहज शक्य होणे अशक्य अजिबात नव्हते असे आपणास पुढील काळ व परिस्थिती सांगून जाते. असो पण या सर्वांतून त्याही काळी व आताही आम्ही आम्हाला आत्मघाती ठरत असलेल्या मागास मनोवृत्ती व द्रुष्टीकोन सोडण्यास तयार नाहीत आणि याचमुळे आम्ही विकसित होत नाहीत असे म्हणावे वाटते. फक्त या प्रकरणावरून आपण एकच ठरवू यापुढे पुढे जानार्याच्या मध्ये पाय घालण्यापेक्षा देता येत असेल तर हात व साथ देऊया. कारण आपली माणसे मोठी झाली तरच आपण मोठे होऊ शकतोत आणि यालाही शिवइतिहासच "गवाह" आहे..!"
"आपल्या पोटच्या गोळ्याने देखन् स्वराज्य उभारावं हे शहाजी-जिजाऊंचे स्वप्न होते..!" आपल्याला इतिहास सांगुन जातो की "स्वराज्य उभा राहावे ही श्रींची इच्छा होती..!" हे अगदी खरे आहे ते "श्री" म्हणजे शिवबांचे तीर्थरूप "शहाजी-जिजाऊ" होय. शहाजीनीच स्वराज्य उभे करण्याची त्या काळी समजली जाणारी बंडखोरी अनेक वेळा केली होती. समाजाला गुलामगिरीची व हुजेरीगीरी ची सवय मागील ३-४ शतके लागल्याने नवनिर्माणाची सवय राहिली नसल्याने आप्तानची साथ-सोबत मिळवने अवघड होऊन बसले होते. शहाजीनच्या बंडखोर कृतींनी लोकांत स्वराज्याच्या विचारांची ठिणगी पेट्न्यास सुरुवात झाली होती हे शहाजीही जाणून होते,तसेच शाहीजणही..!! म्हणुनच त्याना दूरदेशाची कामगिरी सोपवण्यात आली होती. पण त्याठिकाणांवरुन सुध्दा आपल्या स्वराज्याच्या विचारासाठी गप्प बसतील ते शिवबांचे तीर्थरूप कसे. त्यांचे हे हेतु जिजाऊना देखील माहिती होते नव्हे त्यांचे देखील तेचि एकमेव स्वप्न आता बनले होते. म्हणुनच गर्भसंगोपनापासुनच त्यांनी ते संस्कार व विचारकळी खुलविन्यास सुरुवात केलेली होती. शहाजीना हे पक्के माहिती होते म्हणूनच जे स्वप्न पाहण्यात व निर्माण करण्यात आपला वेळ गेलाय ते स्वप्न आपल्या शिवबाच्या हातून (आपण स्वतः जाऊ शकत नसल्याने) जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण करू शकतोत ही खूणगाठ मनाशी पक्की करूनच आपल्या प्रिय पत्नी-मुलास अतिजड अंतःकरणाने स्वप्नहेतु साफल्यासाठीच बंगळूरहून पुण्याला पाठवण्याचा त्याग त्यांनी केला. त्याच वेळी त्यांनी त्यांच्या सोबत जहागिरीची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वनिर्मित "राजमुद्रा" दिली. हाच त्यांचा स्वराज्य स्थापण्याचा स्पष्ट संकेत होता. "राजमुद्रा"च्या अर्थावरूनच स्पष्ट होते की "स्वराज्य" निर्माण व्हावे ही एकमेव त्यांचीच ईच्छा व स्वप्न होत. (अर्थ-"प्रतीपदेच्या चंद्रकले प्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी शहाजीचा पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा लौककल्याणासाठी आहे..!") विशेष ती राजमुद्राही त्यांनी जाणूनबूजून "संस्कृत" भाषेत दिली असावी. कारण आपल्या एतद्देशीयांना शिवबांच्या स्वराज्य हेतुचा गर्भितार्थ कळावा. एवढेच नव्हे तर त्याच वेळी शहाजीराजेनी आपले निष्ठावंत व स्वराज्य विचार-भावनेचे पाईक असणाऱ्या कान्होजी जेधेंना मावळातील देशमुखांना सोबत घेऊन स्वराज्यासाठी शिवबांच्या पाठीशी राहण्याबाबतीत फार्मवले आहे,याच कान्होजीनी ह्यातभर शिवरायांसोबत स्वराज्याची सेवा केली. स्वराज्याचे स्वतःचे स्वप्न आपला उमेदवय संपल्यानंतर आपल्या मार्गदर्शन-विचाराने आपल्या शिवबाकडून जाणिवपूर्वक पूर्ण करून घेणाऱ्या जिजाऊ-शहाजीराजेना यानिमित्ताने मानाचा मुजरा....!"
"शिवरायांनी आपल्या नजरेखाली आपल्या मुलाला,शंभुला निती-तत्व-विचार-संस्कार देऊन जाणीवपूर्व सर्वशक्तिमान प्रगल्भ योद्धा बनविले होते..!" सध्याच्या काळात कर्तुत्वान माणसाचा मुलगा कर्तुत्ववान असेलच असे नाही.?!."हे सर्रास म्हणण्याची प्रथा पडली आहे. वास्तवात असे आता का म्हटले जातय याची वास्तवता तपासली तर सध्याच्या काळात कर्तुत्ववान माणसे आपला पुढील "वारसा" काय करतो आहे हे पाहण्याचे "कर्तुत्व" करत नाही म्हणुन असे घडते. पण या पिवळ्या चष्म्याची फूटपट्टी इतिहासालाही सर्रास लागू करण्यास व त्या बाबतीत दुराग्रही राहण्याचा मूर्खपणा काही जण जाणूनबुजुन करण्याचा प्रयत्न नेहमी करत आलेले आहेत. युगपुरुष शंभुबाबतीत तर हे खुपच अति झाल्याचे दिसून येते. शिवरायांनी आपल्या निगराणीखाली शंभूराजेंना वाढवलेच नाही तर जाणीवपूर्वक घडविले आहे. ज्या राजाने आजही आदर्शवत असणाऱ्या असंख्य बाबी त्या काळी करून ठेवल्या अश्या दूरदृष्टीच्या गुरूचा शिष्य कसा असेल?. अरे षंडानो व बोरू बहाद्दरानो ज्या "शिवाजी" या तीन अक्षरांच्या नुसत्या उच्चाराने चार शतकानंतर आजही शरीराचा रोमन-रोम उभा राहतो. ज्याचे जीवनचरित्र आम्हाला जगण्याचा मार्ग व प्रेरणा देते. त्या वाघाचा बछड़ा तुम्ही रंगवला तसा नसेल हे सांगायला आता कोण्या अन्डुपान्डुचा काळ आता राहिलेला नाही. १४ व्या वर्षी संस्कृतमध्ये ४ ग्रंथ लिहिणारा, १६ भाषांवर प्रभुत्व असणारा, युध्द कलेत एवढा निपुण की ९ वर्ष आपल्या शक्ती-युक्तीच्या बळावर बलाढ्य मुघल सैन्याला जेरीस आणणारा, दोन-दोन वाघांशी एकाच वेळी लढणारा, १२ आघाड्यांवर एकाच वेळी कर्तुत्वाचे नेत्रुत्व करून शत्रुंच्या युध्दतयारीचे बारा वाजवनार्या आणि ४० दिवस अनन्वित आत्याचार सहन करणारा "छावा" कसा असेल हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही आणि कर्तुत्ववान माणसांची वारस देखील कर्तुत्ववानच असतात हे शंभूराजांनी त्या काळी सिद्ध केले आहे व आजचे वारस ही तसे करतील फक्त पालकांनी शिवरायांसारखे वारसाचे संगोपन करने गरजेचे आहे.
"आपल्या मावळयांत स्वाभिमान निर्माण करून त्यांना स्वराज्य कामास लावणे हा शिवबांचा स्वराज्य निर्मिती वेळी "वचननामा" होता, तर "सर्वांस पोटास लावणे" हा शिवरायांचा स्वराज्याचा "जाहीरनामा" होता..!!" शिवबांचा इतिहास जेवढा ढाल तलवारीचा आहे,त्यापेक्षा तो जास्त नवनिर्माणाचा, परीवर्तनाचा, सामाजिक न्यायाचा, स्री स्वातंत्र्यासह आदराचा व आधाराचा, धर्मसहिष्णुतेचा आणि रचनात्मक कार्याचा आहे. ४-५ शतके गुलामीची व हुजेरीगिरीची सवय लागल्याने जनमनातून स्वातंत्र्याशिवाय स्वाभिमानही बोथट झाला होता. त्यामुळे त्यांच्या सद्-विवेक बुध्दीत व भावनाशून्य मनांमध्ये स्वराज्याचे स्फुलिंग निद्रिस्त झाले होते. शिवबांनी या परिस्थितीने गंजलेल्या व गांजलेल्या लोकाना प्रथम एकत्र करून आपल्या प्रेमळ विचार-उच्चार-आचरनाणे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देण्यासोबतच स्वाभिमान निर्माण केला व त्यांना स्वराज्य निर्माण करण्याचे अभिवचन दिले. उच्चारनिहाय आचरण करणाऱ्या या युगपुरुषाच्या या वचननाम्यावर सामान्य जणांनी नुसता विश्वासच ठेवला नाही तर "...लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे!" या उद्दात्त हेतूने आपल्या जीवावर तुळशीपात्र ठेवले. या आत्म्यांच्या जीवनावर आणि जिवावरच देखण स्वराज्य उभे राहिले. स्वराज्यामध्ये शिवरायांनी घेतलेल्या वतनदारी बंद करून वेतनदारी पद्धत, नियोजनबद्ध दुर्ग बांधणी, बाजार पध्दती, चौथाई सारा पध्दती, आपल्या मोहिमेची आखणी हंगाम व ऋतु पाहून करने, सैन्याला गवताच्या काडीलाही हात लागणार नाही असे पीक रक्षणाचे सक्त फर्मान काढणे, पर्यावरण रक्षण करण्याचे नियोजन करने, धरणे बांधणे, जात-धर्म समतोल राखणे, सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळाना देणगी देणे, गुणवत्तेच्या आधारावर पदे देणे, प्रथमच विकेंद्रीकरणासाठी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती करने व अशाच असंख्य दूरदृष्टीचे निर्णय पाहिले की शिवमनात "सर्वांस पोटास लावणे" हा जाहिरनामा कोरलेला असल्याचे स्पष्ट जाणवते.!" धन्य तो युगपुरुष, युगप्रवर्तक, युगनिर्माता.. धन्य तो विचारकुशल संस्कारशील नेता, आदर्श राजा आणि दूरदृष्टीचा समाज शिक्षक:-छत्रपती शिवाजी..
"शिवबा ते छत्रपती शिवाजीराजे जीवनप्रवास हा संस्कार-निष्ठा-प्रेम-निती-तत्व-ममत्व-पालकत्व-समता-विश्वास-बंधुता-पारख-पर्यावरण रक्षक-दूरदृष्टी एव्हाना सर्वच मानवी मूल्यांचे "परमोच्च परिमाण" आहे..!" "कर्तुत्वाचा अर्थ म्हणजे शिवराय, कर्तुत्वाची शर्थ म्हणजे शिवराय, कर्तुत्वाची दिशा म्हणजे शिवराय, कर्तुत्ववानांचा सन्मान म्हणजे शिवराय, कर्तुत्ववानांचा अभिमान म्हणजे शिवराय , कर्तुत्ववानांचा स्वाभिमान म्हणजे शिवराय, कर्तुत्ववानांचा श्वास म्हणजे शिवराय, कर्तुत्ववानांचा निवास म्हणजेशिवराय, कर्तुत्वाचा महामेरू, विचारकुशल संस्कारशील नेता, आदर्श राजा आणि द्रष्टा समाजशिक्षक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..!! "राजे"ना कोणत्याही एका चौकटीत बंदिस्त करू नये हिच आज एक शिवप्रेमी या नात्याने रास्त अपेक्षेसह भावनिक एकता व एकात्मतेचे मनापासुन आवाहन..!! जीवनात "मानवीय" विचार व "सजीव प्रेम" वाटुयात...!"धन्य शिवबा राजे....धन्य ती महाराष्ट्र-भारत भू...!" जय शिवराय ..!! "राजांना व आपणास माझा आज शिवजयंती निमित्ताने प्रेमाचा मुजरा..!" जय हो..॥
-शिवाजी खुडे


No comments:
Post a Comment